चाळीसगाव बसस्थानकात गहाळ झालेले सहा ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधून महिलेला परत केले. हे दागिने सापडल्यानंतर प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या हर्षदा माळी यांचेही कौतुक होत आहे.
दीपाली विलास पाटील (रा. टाकळी प्र. दे., ता. चाळीसगाव) यांचे रविवारी (ता. १५) बसस्थानक परिसरात सहा ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने गहाळ झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजमधून शोध
बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हे दागिने हर्षदा भास्कर माळी (रा. श्यामवाडी, ता. चाळीसगाव) यांना सापडल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी दागिने सापडल्याचे सांगून ते प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी दागिने दीपाली पाटील यांना परत केले.
पोलिसांचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक
पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि हर्षदा माळी यांच्या प्रामाणिकपणामुळे महिलेचे हरविलेले दागिने पुन्हा मिळाले. या कामगिरीबद्दल पोलिस कर्मचारी कुंदन अडकमोल, राकेश महाजन, प्रवीण पवार, प्रवीण महाजन, नंदकिशोर महाजन, विजय महाजन आणि हर्षदा माळी यांचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी अभिनंदन केले.
Leave a Reply