जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात असलेल्या श्यामनगरात चोरट्यांनी एकाच रात्री चार बंद घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला तीन घरफोड्यांची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याच परिसरातील आणखी एका घरातही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केल्याचे स्पष्ट झाले आहे.
१५ नोव्हेंबरला पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास चोरट्यांनी ही कृत्ये केली. कटरच्या साहाय्याने घरांची कुलपे आणि कडीकोयंडे तोडून त्यांनी आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी कपाटांचे लॉकर उघडले आणि त्यातील मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले. या घटनांनंतर केवळ एका घरमालकाने घरी परतून पाहणी केली आहे. अन्य घरमालक अद्याप बाहेरगावी असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.
चौथी घरफोडी मंदिराच्या मागील बाजूला
तीन घरांच्या जवळच पशुपतीनाथ मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या आणखी एका घरातही चोरी झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. घरमालक बाहेरगावी असल्याने अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे रामानंदनगर पोलिस ठाण्यात या घटनांबाबत अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. सलग चार घरफोड्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
श्यामनगर परिसर हा वाढीव परिसर असून, येथे बहुतांश मोकळी वस्ती आहे. त्यामुळे चोरट्यांना बंद घरे लक्ष्य करणे सोपे जात आहे. यापूर्वीही या परिसरात घरफोडी आणि चारचाकी वाहन चोरीच्या घटना घडल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
Leave a Reply