मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त गावांत गुटखा-जुगाराचा विळखा; कारवाईची मागणी

अपुऱ्या पावसामुळे धुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती; ग्रामीण भागात गुटखा तस्करीचा सुळसुळाट. हे धंदे बंद करावेत, अशी मागणी शिवसेनेने पोलिस अधीक्षकांकडे केली.

दुष्काळग्रस्त गावांत गुटखा-जुगाराचा विळखा; कारवाईची मागणी

धुळे जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश स्थितीचा फायदा घेत ग्रामीण भागात अवैध व्यवसाय आणि गुटखा तस्करीचा सुळसुळाट झाला आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडत असून, हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे सोमवारी (१६ नोव्हेंबर) निवेदनाद्वारे केली. दरम्यान, ग्रामीण भागातील सर्व अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्यात येतील, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार जिल्ह्यात पावसाचे प्रमाण व वितरण समाधानकारक न राहिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शेतीचे उत्पन्न रोडावल्याने मुलामुलींचे शिक्षण, विवाह, आरोग्य आणि कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. अशा बिकट स्थितीत शहरातील अवैध गुटखा तस्करीचे जाळे ग्रामीण भागात पसरले असून, अवैध जुगार, दारू निर्मिती व विक्री आणि अमली पदार्थांचा व्यापार जोरात सुरू आहे.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, हेमराज पाटील, संदीप सूर्यवंशी, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, शांताराम माळी, गजेंद्र पाटील, अजय चौधरी, कपिल लिंगायत, गुलाब धोबी आदी उपस्थित होते.

वसुलीसाठी विशेष दलाल नेमले

वसुलीसाठी ग्रामीण भागात विशेष एजंट (दलाल) नेमण्यात आल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असून, आधीच आर्थिक संकटात असलेल्या ग्रामीण कुटुंबांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडत असल्याबद्दल पक्षाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शहरात वचक निर्माण केल्यानंतर आता तालुक्यांच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये आणि ग्रामीण भागात सुरू असलेला हा गैरप्रकार थांबवून संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance