मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात अवैध व्यवसायांविरोधात महापौरांची मागणी

धुळे महापौर मायादेवी परदेशी यांनी अवैध व्यवसाय, गोवंश तस्करी व बनावट मद्यविक्रीविरोधात कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

धुळ्यात अवैध व्यवसायांविरोधात महापौरांची मागणी

धुळे, ता. १६ : शहरासह जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गोवंश तस्करी, बेकायदा कत्तलखाने, गुटखा व बनावट मद्यविक्रीचे रॅकेट, तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी महापौर मायादेवी परदेशी यांनी केली आहे. सोमवारी (ता. १६) त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून सविस्तर निवेदन सादर केले. पुढील चार दिवसांत केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

धुळे शहर व जिल्ह्यात थंडीची जाणीव होऊ लागली असली, तरी दुसरीकडे गेल्या पंधरवड्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक भाजप विरुद्ध गोरक्षक, असा शाब्दिक वाद सुरू आहे. आमदार अनुप अग्रवाल आणि महापौरपुत्र विकी परदेशी विरुद्ध गोरक्षक संजय शर्मा, असे चित्र समोर येत आहे. महापौर परदेशी आणि त्यांचे पती तथा धुळे बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनाही लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या वादात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे आणि उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनीही सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच तापले आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चार प्रमुख मागण्या

महापौर परदेशी यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे निवेदनाद्वारे चार मागण्या केल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गोसेवकांनी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करत सुमारे १०० ते १५० गोवंशांची कत्तलीपासून सुटका केली होती. मात्र, या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नसल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून या तस्करीमागील आर्थिक व्यवहार, वाहतूक स्रोत आणि सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटित टोळीचा सहभाग आढळल्यास दोषींवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

धुळे शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमुळे कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिका, पोलिस प्रशासन व संबंधित विभागांनी संयुक्त तपासणी करून हे कत्तलखाने तात्काळ बंद करावेत, नियमानुसार ते सील करावेत आणि तेथे पुन्हा गैरप्रकार होऊ नयेत यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी दुसरी मागणी आहे.

रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी

धुळे तालुका पोलिस ठाणे व पिंपळनेर परिसरात नुकत्याच झालेल्या कारवाईत प्रत्येकी सुमारे १०० पोती प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती सार्वजनिक करून जप्त मालाचा पुरवठादार, मालक आणि बनावट मद्यविक्री रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विचारात घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

गोरक्षक संजय शर्मा यांनी शहराचे आमदार व महापौरांविरोधात केलेल्या कथित वक्तव्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी चौथी मागणी आहे. उपलब्ध ध्वनिचित्रफिती, ध्वनिमुद्रिका व सोशल मीडिया पोस्टची तपासणी करून त्यामध्ये जातीय अवमान, धमकी किंवा दोन समाजगटात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न आढळल्यास अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

शहरात कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाला, गोवंश तस्करीला किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना थारा मिळू नये, असे महापौर परदेशी यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी समान असून दोषी कोणत्याही पदाचा, पक्षाचा किंवा समाजाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. प्रशासनाने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन चार दिवसांत कारवाईचा लेखी तपशील द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कथित गोरक्षकाकडून सोशल मीडियाद्वारे आपल्यावर बिनबुडाचे, तथ्यहीन व बदनामीकारक आरोप होत असल्याचे सांगत, महापौरपदाचा राजीनामा देईन, पण चुकीचे, निराधार आरोप सहन करणार नाही, असेही महापौर परदेशी यांनी म्हटले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance