नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्यासाठी महापालिकेने १९१.२१ एकर जमिनीचे कायमस्वरूपी संपादन करण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. या संपादनाबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर सूचनेवर मुदतीत ३० शेतकऱ्यांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या आहेत. या शेतकऱ्यांनी जमिनीसंदर्भातील कागदपत्रेही सादर केली आहेत.
सिंहस्थाची पहिली पर्वणी अवघ्या दहा महिन्यांवर आली आहे. यंदा आखाडे, साधू-महंत आणि भाविकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तपोवनात ३३७ एकरावर साधूग्राम आणि १३८० एकरावर अतिरिक्त साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त जागेच्या भाडेपट्ट्याला शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असले, तरी आरक्षित असलेल्या १९१.२१ एकरच्या संपादनाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
३० शेतकऱ्यांच्या हरकती; वाटाघाटी करून प्रक्रिया
जाहीर सूचनेवर आलेल्या हरकतींचा विचार करून दर निश्चिती झाल्यानंतर या शेतकऱ्यांशी वाटाघाटी करून संपादनाची पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादन होणार असले, तरी त्याची प्रशासकीय प्रक्रिया महापालिका राबवीत आहे.
दर निश्चिती हाच मोठा अडथळा
या संपादनासाठी ५ जून रोजी २,२६७ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, निधी मंजूर होऊनही भूसंपादनाचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. हाच या कामातील मोठा अडथळा ठरला आहे.
तपोवनात साधूग्रामासाठी २८०.४६ एकर आणि संलग्न सुविधांसाठी ९७.०५ एकर अशी एकूण ३७७ एकर जागा आरक्षित आहे. त्यापैकी ९४.०७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आली असून २८३ एकर संपादन बाकी आहे. त्यात १३ एकरात जनार्दन स्वामी मठ आणि लक्ष्मी गोशाळा असून १.५ एकरात अभिन्यास मंजूर आहे. त्यामुळे प्रत्यक्षात १९१ एकर जमीन संपादित केली जात आहे.
Leave a Reply