राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते अद्याप रखडलेले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते कधी जमा होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
निधीसाठी कृषी विभागाचं पत्र, वित्त विभागाचं उत्तर प्रलंबित
नमो शेतकरी सन्मान निधीच्या तीन हप्त्यांसाठी कृषी विभागाने ५ हजार ४२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, असं पत्र पाठवलं आहे. त्यावर वित्त विभागाकडून अजूनही उत्तर मिळालेलं नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना केंद्राच्या पीएम किसान योजनेतून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. केंद्राचा हप्ता वितरित झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांत राज्याच्या योजनेतूनही पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळतो. मात्र वर्ष झालं तरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये येतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
९१ लाख शेतकऱ्यांसाठी १ हजार ८२२ कोटींची मागणी
कृषी विभागाकडून याआधीच दोन हप्त्यांसाठी ३ हजार ७०० कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली होती. आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर कृषी विभागाने तीन हप्त्यांसाठी एकत्र पैसे मागितले आहेत. राज्यातील ९१ लाख १२ हजार ७३५ शेतकऱ्यांसाठी १ हजार ८२२ कोटी ५४ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनाकडे मागण्यात आला आहे. मात्र इतर योजना, कर्मचाऱ्यांचे वेतन, आमदार-माजी आमदारांचे वेतन, निवृत्तिवेतन आणि कर्जावरील व्याज यातून पैसेच शिल्लक राहत नसल्याने सध्या निधी मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी निधी मिळावा म्हणून वित्त विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे केंद्राने नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईची रक्कम वाढवल्याने राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाला दुष्काळ मदतीचा फेरप्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
Leave a Reply