बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळाचे रूप धारण करण्याच्या मार्गावर आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत मोठा इशारा दिला आहे. या महिन्यातील हे तिसरे मोठे चक्रीवादळ ठरणार आहे. याआधी मुरासु आणि अर्णब या चक्रीवादळांनी देशाच्या अनेक भागांत जोरदार हजेरी लावली होती. आता नव्या वादळाचा इशारा मिळाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सतर्कता वाढली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ नोव्हेंबर रोजी कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी हे वादळ पुढे सरकेल आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात धडकेल. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचीही शक्यता आहे.
## ओडिशात प्रशासन सज्ज
ओडिशा, तामिळनाडूसह अन्य काही राज्यांनाही या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ओडिशा सरकारने इशारा मिळताच उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तयारी सुरू केली आहे. मंत्री सुरेश पुजारी यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काही पथके तैनात करण्यात आली आहेत. २४ जिल्ह्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ओडिशा आपत्ती प्रतिसाद दल आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. १८ आणि १९ तारखेला दाखल होणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले आहे. मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
## महाराष्ट्रात दिलासा मिळणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तामिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यांना या वादळाचा फटका बसेल. पुडुचेरी आणि कराईकल जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या काही भागांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांतही पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून अपेक्षित पाऊस झाला नाही. अशा स्थितीत चक्रीवादळामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असून थोड्याफार प्रमाणात पाऊस कोसळताना दिसत आहे. अर्णब चक्रीवादळाच्या वेळीही महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पाऊस झाला होता. आता या वादळादरम्यानही राज्यातील काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात प्रशासनाने तयारी सुरू केली असून अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे.
Leave a Reply