सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र: ११ महिन्यांत ११ बळी

भंडारा जिल्ह्यात ११ महिन्यांत प्राण्यांच्या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. मागील २० दिवसांत चौघांचा बळी गेल्याने वन विभागावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र: ११ महिन्यांत ११ बळी

भंडारा जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्षाने यंदा अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच लगतच्या ब्रह्मपुरी वन विभागात वाघांचे मोठे अस्तित्व आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जंगलाला लागून असल्याने गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये वन विभागाविरोधात तीव्र रोष उसळला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ११ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

दिवाळीतच तीन बळी

यातील चार बळी केवळ मागील २० दिवसांमधले आहेत. दिवाळीच्या दहा दिवसांच्या आत दोन निरागस बालकांसह एका २३ वर्षीय तरुणाचा वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाघ आणि बिबट्या थेट गावांमध्ये आणि शेतात शिरून मानवी बळी घेत आहेत. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत चंद्रपुरात मानव-वन्यप्राणी संघर्षात बळी जाण्याचे प्रमाण मोठे असतानाच, आता भंडारा जिल्ह्यातही वन्य प्राण्यांचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोंढी गावात पाळीव जनावरांचा बळी

वाघांनी आता पाळीव जनावरांनाही लक्ष्य केले आहे. आज पहाटेच्या सुमारास भंडाऱ्याच्या कोंढी गावात तीन पाळीव जनावरांना ठार करण्यात आले. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून अशात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पशुधन मालकांना तातडीने आर्थिक मदत देऊन या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांसह पशुपालकांनी केली आहे.

या गंभीर परिस्थितीवर आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज असल्याचे मत मानद वन्यजीव सदस्य शाहिद खान यांनी व्यक्त केले असून, त्यांनी वन विभागाला तात्काळ कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जंगललगतच्या गावांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना वाढवून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी वन विभाग नेमकी काय पावले उचलतो, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance