रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडी; नागरिकांचे हाल

म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडी होत असून उड्डाणपुलाचे काम दहा ते बारा वर्षांपासून रखडले आहे. अतिक्रमणामुळे एसटी बससेवा विस्कळीत होऊन नागरिकांचे हाल होत आहेत.

म्हसावद चौफुलीवर वाहतूक कोंडी; नागरिकांचे हाल

म्हसावद-बोरनार रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने म्हसावद येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच गेल्या दहा ते बारा वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अवजड वाहनांची वाहतूक गावातूनच सुरू आहे. परिणामी, मुख्य चौफुलीवर दररोज वाहतूक कोंडी होत असून वाहनधारक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

म्हसावद येथील चौफुली परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण आणि अरुंद झालेल्या मार्गामुळे अवजड वाहनांसह एसटी बसेसना मार्ग काढणे कठीण होत आहे. याचा थेट परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असून एरंडोल आगाराच्या बसेस अतिक्रमण आणि काहींकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एसटी सेवेवर परिणाम

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असताना एसटी बससेवा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत. सध्या ग्रामीण भागात जळगाव-कुरंगी ही बस एकमेव बस ये-जा करत असल्याची परिस्थिती असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे.

म्हसावद हे पंचक्रोशीतील मोठे आणि महत्त्वाचे गाव आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसीअंतर्गत म्हसावद पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा अशी महत्त्वाची प्रशासकीय व आर्थिक कार्यालये आहेत. या ठिकाणी दररोज परिसरातील अनेक गावांमधून नागरिकांची ये-जा सुरू असते. असे असतानाही वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि एसटी बससेवेच्या समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाकडे मागणी

म्हसावद येथील रखडलेले उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणे, सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे, चौफुलीवरील अतिक्रमण हटविणे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच एरंडोल आगारासह संबंधित परिवहन विभागाने बंद किंवा विस्कळीत झालेल्या बसफेऱ्यांचा प्रश्न सोडवून ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance