नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. वडाळा परिसरातून जाणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या विकासाला आता वेग आला आहे. लेखानगर ते राष्ट्रीय महामार्ग-३, कलानगर चौक, वडाळा गाव, रविशंकर मार्ग आणि विजय ममता चौक या पट्ट्यातून हा रस्ता जाणार आहे.
या मार्गात येणारी खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागाने महासभेची परवानगी मागितली आहे. शहराची पहिली विकास योजना १९९३ मध्ये, तर सुधारित विकास योजना २०२० मध्ये मंजूर झाली होती. त्यात वडाळा शिवारातील सर्वे क्रमांकांमधून हा ३० मीटर रुंदीचा रस्ता दर्शविण्यात आला आहे. सध्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
विजय ममता चौकातील कोंडीवर उपाय
विजय ममता चित्रपटगृहाजवळ नाशिक-पुणे रस्त्याला मिळणाऱ्या चौकात कुंभकाळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण आणि योग्य नियोजन अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी चौकाजवळील सुमारे १ हजार ५४ चौरस मीटर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे.
वाटाघाटीतून जागा घेण्याचा प्रयत्न
या जागेचे टीडीआर घोषणापत्र अद्याप तयार झालेले नाही. त्यामुळे सुरुवातीला जागामालकांशी चर्चा करून सामंजस्याने आणि खासगी वाटाघाटीतून जागा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाटाघाटीला प्रतिसाद न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून नियमानुसार जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. महासभेची मान्यता बंधनकारक असल्याने हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.
Leave a Reply