निफाड तालुक्यातील पिंपळस (रामाचे) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या २००८ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
शाळेशी नाते अधिक दृढ करण्याचा उद्देश
माजी विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच जीवनाला योग्य दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली. नानासाहेब ताजणे, अॅड. रवींद्र ताजणे, अॅड. संजय कुलकर्णी, तानाजी पूरकर, विक्रम ताजणे, अरुण डांगळे, आप्पा त्रिभुवन आणि नितीन मत्सागर आदी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेत मदतीचा हात दिला. शाळेसाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे, या भावनेतून त्यांनी विविध स्वरूपात सहकार्य केले.
पुढील उपक्रमांसाठी सहकार्याचा निर्धार
यापुढील काळात शाळेला शैक्षणिक साहित्य, डिजिटल शिक्षण सुविधा, क्रीडा साहित्य, गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच करिअर मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. जुन्या आठवणी, गुरुजनांविषयीचा आदर, सामाजिक बांधिलकी आणि शाळेच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याची भावना यामुळे हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला.
Leave a Reply