नामपूर शहरातील मटण मार्केट परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील विविध भागांतून ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारा कचरा मोसम नदीकाठावरील मटण मार्केट परिसरात टाकला जात आहे. शहरातील विविध भागांतून घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. मात्र, हा कचरा मटण मार्केट परिसरात टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
डंपिंग ग्राउंड असतानाही कचरा वस्तीत
मोराणे रस्त्यालगत तालुका क्रीडा संकुलाच्या शेजारी ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीत अनेक वर्षांपासून डंपिंग ग्राउंड उपलब्ध आहे. मात्र, संकलित कचरा दुसरीकडे टाकला जात असल्याने डंपिंग ग्राउंडचा वापर नेमका का केला जात नाही, तसेच पर्यायी ठिकाणी कचरा टाकण्यामागील कारण काय, असा सवाल नागरिकांसह आनंद, क्रांती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शहराचा विस्तार वाढत असताना दैनंदिन कचऱ्याचे संकलन आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे ही ग्रामपंचायतीसमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, नागरी वस्तीच्या परिसरात कचरा टाकला जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्वच्छतेची मागणी; आंदोलनाचा इशारा
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मटण मार्केट परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करावी आणि यापुढे नागरी वस्तीच्या परिसरात कचरा टाकला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्यात येईल, असा इशाराही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Leave a Reply