दुष्काळी परिस्थितीत जलतारा बंधारे उपयुक्त ठरत आहेत. प्रत्येक गावात शंभर जलतारा बंधारे बांधल्यास पाणी समस्येवर मात करणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने शंभर जलतारांचे प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन योजक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी केले. शेतकऱ्यांचे स्वतःचे खासगी मार्केट उभे करण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
डिसेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या नंदुरबार डेव्हलपमेंट समीटच्या पार्श्वभूमीवर श्रावणी येथे खांडबारा रुरल फार्मर प्रोड्युसिंग कंपनीत नेसू परिसर विकास परिषद झाली. परिषदेला परिसरातील ३५ गावांमधील शेतकरी, पोलिसपाटील, सरपंच आणि नागरिक उपस्थित होते. किसन वळवी यांनी नंदुरबार डेव्हलपमेंट समीटची दिशा स्पष्ट केली.
पाणीटंचाई आणि स्थलांतराचे संकट
योजकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी नेसू परिसराच्या विकासातील अडचणी विशद केल्या. यंदा सातपुडा पट्ट्यात केवळ ३०० मिमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई आणि त्यामुळे होणाऱ्या स्थलांतराचे संकट उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी जलतारा हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक गावात जलताराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आंब्याची पाच आणि सागाची पाच झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे डॉ. डांगे म्हणाले.
ग्रामपंचायतीमध्ये नमुना नंबर ४ चा फॉर्म भरून रोजगार हमी योजनेतून गावातच रोजगार उपलब्ध केल्यास मजुरांचे स्थलांतर थांबेल, असा विश्वास सरपंच राजू वळवी आणि प्रदीप वळवी यांनी व्यक्त केला. शेतकरी हरीश चौधरी म्हणाले की, गेल्या वर्षात त्यांनी स्वतःच्या खर्चाने दहा जलतारे स्वतःच्या शेतात तयार केले आहेत. या वेळी उपस्थित सरपंच आणि शेतकऱ्यांनी स्थानिक प्रश्न आणि अडचणी मांडल्या. रोबिन नाईक आणि धरमसिंग यांनी शेतीसाठी लागणारी वीज, पाणी, खते, बियाणे आणि विक्री व्यवस्था तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पाला गती मिळावी, अशी मागणी केली. देवराजसिंग पाडवी यांनी वन हक्क जमीन नावावर नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
शेतीपुरक व्यवसायांवर भर
पशुखाद्याचे वाढते दर आणि दुधाला मिळणारा कमी भाव यामुळे दुग्ध उत्पादक अडचणीत आला आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता रेशीम उद्योगावर भर द्यावा. परिसरात या व्यवसायाला चांगली संधी आहे, असे राजेंद्र वसावे यांनी सांगितले. भाजीपाला, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय असे शेतीपुरक व्यवसाय सुरू केले पाहिजेत. परिसरात एकात्मिक शेती प्रयोग करण्याची गरज आहे. नाबार्डच्या माध्यमातून आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे परिसरात फळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकेल, असे कृष्णा कोकणी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खांडबारा येथे शेतकऱ्यांचे स्वतःचे खासगी मार्केट उभे करण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव नेण्याची संकल्पना डॉ. गजानन डांगे यांनी मांडली. खांडबारा परिसराला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येत्या तीन महिन्यांत परिसरातील शंभर टक्के नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड आणि किसान कार्ड मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी ठराव मंजूर करण्यात आला. किसन वळवी यांनी आभार मानले.
Leave a Reply