आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगवी ग्रामपंचायतीने जलसंधारणाचा पुढाकार घेतला आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून अरुणावती नदीपात्रात ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. सोमवारी (ता. ९) राबविण्यात आलेल्या या उपक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वाळूच्या गोण्यांतून बंधारा
जिल्हा परिषद व शिरपूर पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये वाळू भरून त्यांचा वापर करत नदीपात्रात वनराई बंधारा बांधण्यात आला. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार असून, भूजल पातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. परिसरातील पशुधन व वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
लोकसहभागातून जलसंधारण
पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभारण्याचा सांगवी ग्रामस्थांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. या वेळी सरपंच कनिलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोळी, ग्रामविकास अधिकारी संजय बागूल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply