शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत लवकरच वाचकांसमोर एका वेगळ्याच विषयावरचं पुस्तक घेऊन येणार आहेत. ‘भूतभजन’ असं या पुस्तकाचं नाव असून त्यात भूत-प्रेत, अतृप्त आत्मे आणि या विषयाशी जोडलेले जगभरातील मान्यवरांचे अनुभव मांडले जाणार आहेत. राऊत यांनी या पुस्तकाची घोषणा करताना देश आणि राज्याच्या राजकारणावरही मिश्किल भाष्य केलं.
राजकारणातील अतृप्त आत्मे
राऊत म्हणाले की, राजकारणातही काही अतृप्त आत्मे असतात. असे लोक गेले तरी ते फिरताना दिसतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते या विषयावर फारसं लेखन होत नाही. भूत-प्रेत आणि देव या कल्पना समाजात रुजलेल्या आहेत. जगभरात अनेक जण देवाचं अस्तित्व पूर्णपणे मानतात, तर काही जण त्याला नकार देतात. जे आहे, त्याचा अभ्यास करून ते समोर आणलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आपला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा अवतार म्हटलं जातं, मात्र त्याला वैज्ञानिक आधार नाही, असंही ते म्हणाले. अशा विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास होणं गरजेचं आहे, असं त्यांनी नमूद केलं. अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर त्यांचं भूत फिरत असल्याच्या कथांचाही पुस्तकात उल्लेख असणार आहे.
बाळासाहेबांवरील आठवणी आणि नवं पुस्तक
राऊत यांनी आपल्या लेखनप्रवासाबद्दल सांगितलं की, त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं, पण तो संघर्ष त्यांनी आनंदाने केला. त्यांच्या लेखनाची सुरुवात अशाच वेगळ्या विषयांवरील लिखाणातून झाली होती. आता ‘भूतभजन’मधून ते भूत-प्रेतांचा विषय मनोरंजक पद्धतीने वाचकांसमोर आणणार आहेत. या पुस्तकात पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित एक प्रकरणही असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी बोलताना राऊत भावूक झाले. माझ्या आयुष्यात बाळासाहेबांचा आशीर्वादच खरा आहे. ते आजही माझ्या आजूबाजूला असल्यासारखं वाटतं, असं ते म्हणाले. बाळासाहेबांनी माझा हात धरून मला पुढे आणलं. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ते माझ्यावर चिडायचेही, पण त्या रागामागे प्रेम होतं, असं राऊत यांनी सांगितलं. बाळासाहेबांवर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. माझी पत्नी आणि मुलगी यांनाही तशीच इच्छा आहे. मी जे सत्य आहे तेच लिहितो. मी पाहिलेले आणि अनुभवलेले बाळासाहेब इतरांपेक्षा फार वेगळे होते. त्यांनी स्वतःला कधी देव मानलं नाही, तर एक माणूस म्हणूनच जगले, असं राऊत म्हणाले. त्यामुळे ‘भूतभजन’सोबतच बाळासाहेबांवरील त्यांच्या आगामी पुस्तकाचीही उत्सुकता वाढली आहे.
Leave a Reply