शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांचा ताफा अडकताच सांगोला पोलिसांना जाग

महूदच्या चौकातील कोंडीत पालकमंत्र्यांचा ताफा अर्धा ते पाऊण तास अडकल्यानंतर पोलिसांना जाग आली. अतिक्रमणे हटवण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांचा ताफा अडकताच सांगोला पोलिसांना जाग

सांगोला तालुक्यातील महूद येथील मुख्य चौकातील वाहतूक कोंडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वाहनांचा ताफा सोमवारी (ता. ९) तब्बल अर्धा ते पाऊण तास अडकल्यानंतर सांगोला पोलिस प्रशासनाला जाग आली आहे. चौकातील अनधिकृत अतिक्रमणे आणि होर्डिंग हटवण्याबाबत पोलिसांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रत्यक्ष कारवाई होणार की केवळ पत्रव्यवहारावरच समाधान मानले जाणार, याकडे महूदकरांचे लक्ष लागले आहे.

अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक

जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी महूदचा मुख्य चौक आहे. मात्र, दोन्ही मार्गांवरील वाहतुकीच्या तुलनेत चौकातील रस्ते अरुंद असल्याने येथे नेहमीच कोंडी होते. वारी आणि सण-उत्सवांच्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सोमवारी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कोंडीत पालकमंत्र्यांचा ताफाही अडकला. अखेर पोलिसांना वाहनांतून उतरून वाहतूक सुरळीत करावी लागली. या चौकातील कोंडीमुळे यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.

होर्डिंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न

रस्त्यालगतची अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंग, रस्त्यावर थांबणारी वाहने आणि बेशिस्त वाहतूक यामुळे समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिक्रमणे व होर्डिंग तातडीने हटवण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांना केली असून, कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी दर्शवली आहे. १३ मे २०२४ रोजी मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७५ हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला. न्यायालयाने कडक नियमावली केली. महूदच्या ग्रामसभेतही याबाबत ठराव झाला. मात्र, प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झालेली नाही.

नोव्हेंबर २०२५ मध्ये तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चौकातील काही अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र, मोहीम पुढे सुरू राहिली नाही. उलट, हटवलेली अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत झाली. त्यामुळे आधीची कारवाई दिखाऊ होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सांगोला पोलिसांकडून गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेले पत्र महूद ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. हे पत्र प्रशासक व जबाबदार नागरिकांसमोर ठेवून सांगोला पोलिसांच्या उपस्थितीत लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance