देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश करून मोठ्या प्रमाणावर माहिती चोरी झाल्याची तक्रार नवी मुंबईत दाखल झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीबीडी बेलापूर येथील ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरमधून तब्बल ३ लाख ७५ हजार रेकॉर्ड चोरी झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. चोरी झालेला डेटा डार्क वेबवर प्रसारित केल्याचा आरोपही तक्रारीत आहे.
९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान घुसखोरी झाल्याचा दावा
तक्रारीनुसार, ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या सहा दिवसांच्या कालावधीत ही घुसखोरी झाली. बँकेच्या YONO 2.0 आणि RAAS या महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समधील ३२ सीएसव्ही फाइल्स, दोन जेसन फाइल्स आणि तब्बल २,७२१ पीडीएफ फाइल्स चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, चोरी झालेल्या रेकॉर्डमध्ये नेमकी कोणती ग्राहक माहिती आहे आणि तिचा गैरवापर झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा; तपास सुरू
या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्याने बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यामागे कोणाचे नेटवर्क आहे, डेटा नेमका कुठे आणि कसा वापरला गेला, याचा तपास बेलापूर सीबीडी पोलीस करत आहेत. बँकेच्या यंत्रणेत झालेल्या या कथित घुसखोरीमुळे ग्राहकांच्या डिजिटल माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून ग्राहकांची चिंता वाढली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply