घर आणि ऑफिसमधील अंतर जास्त असेल, तर प्रवासाचा त्रास होतो, असे अनेकांना वाटते. मात्र एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने आपल्या रोजच्या प्रवासातूनच पगारापेक्षा जास्त कमाई केल्याचा दावा केला आहे. हा दावा अंकित पांडे नावाच्या व्यक्तीने केला आहे.
रोज ५ तास गाडी, ३ हजार नफ्याचा दावा
अंकितने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्याचा शेजारी ऑफिसला येण्या-जाण्यासाठी आपल्या खाजगी गाडीचा वापर करायचा. पण एके दिवशी त्याने ती वापरणे बंद केले आणि एक नवीन व्यावसायिक डिझायर गाडी विकत घेतली. त्याने ती उबर आणि रॅपिडोशी जोडली. तेव्हापासून तो सकाळी ५ वाजता घरातून निघतो, वाटेत प्रवासी घेतो, आपल्या टीसीएस ऑफिसला जातो आणि मग परत येतो. एकूण तो आपल्या नोकरीव्यतिरिक्त ५ तास गाडी चालवतो. त्याचा दावा आहे की, तो दररोज ३००० रुपयांचा निव्वळ नफा कमावतो.
अंकितच्या मते, त्या कर्मचाऱ्याचे ऑफिस घरापासून ३० किलोमीटर दूर आहे. रोजच्या ३ हजार रुपयांच्या नफ्याच्या हिशेबाने महिन्याला ७८ हजार रुपयांची अतिरिक्त कमाई होऊ शकते, असा त्याचा दावा आहे. ही कमाई त्याच्या कॉर्पोरेट पगाराव्यतिरिक्त आहे.
नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया
या दाव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने सवाल केला आहे की, ७८ हजार रुपयांसाठी आपला वेळ, इंधन, देखभाल आणि झोप यांचा त्याग करणे योग्य आहे का? तर आणखी एका वापरकर्त्याने हा दावाच खोटा असल्याचे म्हटले आहे. त्याचे म्हणणे आहे की, सामान्य टॅक्सी चालकाने दिवसातून १२ तास काम केले, तरी तो इतके कमवू शकत नाही. ही निव्वळ बनावट गोष्ट असल्याचे त्याने म्हटले आहे.
दुसरीकडे, आणखी एका वापरकर्त्याने या कल्पनेचे कौतुक केले आहे. त्याचे म्हणणे आहे की, रोजच्या प्रवासाला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत बनवणे हा एक हुशार मार्ग आहे, विशेषतः जेव्हा गाडी सहसा उभीच असते. हा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Leave a Reply