रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक: सुजय विखेंना कोर्टाची नोटीस

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सुजय विखे पाटील यांना सहकार न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक: सुजय विखेंना कोर्टाची नोटीस

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलकडून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपद मिळवले. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असलेले सुजय विखे यांची अध्यक्षपदी निवड झाली. मात्र आता या निवडणुकीला सहकार न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना सहकार न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

१६ नोव्हेंबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश

या प्रकरणी १६ नोव्हेंबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुजय विखे हे राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक असताना कारखान्याचे कर्ज थकीत झाल्याने ते जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याचा दावा एकनाथ घोगरे यांनी केला आहे. त्यामुळे विखे यांची संचालकपदासाठीची निवडणूक अपात्र ठरवावी, अशी मागणी करत घोगरे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली असून आता १६ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वकिलांनी काय सांगितले?

काल झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी फॉर्म भरला होता. त्यांच्या फॉर्मला आम्ही हरकत घेतली आहे, असे वकील सुरेश लगड यांनी सांगितले. सुजय विखे राहुरीचे संचालक असताना ते थकबाकीदार असले. कारखान्याने जिल्हा बँकेचे कर्ज थकवले. कायद्याने ते थकबाकीदार आहेत, त्यांच्या सर्व कागदपत्रांवर सह्या आहेत, असे लगड म्हणाले. ही सर्व बाब निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र राजकीय प्रभावाखाली त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

त्याविरोधात आम्ही औरंगाबाद येथील खंडपीठासमोर दाद मागितली. आता खंडपीठाने याबाबत सहकारी न्यायालयात दाद मागा, असे सांगितले. त्यानंतर नगरच्या सहकारी न्यायालयात दाद मागितली आहे. सुजय विखे यांचा निवडणुकीचा अर्ज मंजूर केला, त्याला आम्ही आव्हान दिले आहे. न्यायालयाने आता तात्काळ त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस काढली आहे. न्यायालयाने आता १६ तारखेला त्यांचे स्पष्टीकरण मागितले आहे, असेही वकील सुरेश लगड यांनी सांगितले.

Updated: 14 Nov 2026 10:14 PM

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance