आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी मानवी जीवनात मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाने जीवन कसे जगावे, काय करावे आणि काय करू नये, याचे थोडक्यात सार चाणक्य यांनी या ग्रंथात मांडले आहे. चाणक्य म्हणतात, अशा काही गोष्टी असतात ज्या माणसाने कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे त्याची प्रगती होईलच, शिवाय त्याचे आयुष्य स्वर्गाहूनही सुंदर होईल.
संयम आणि थोरा-मोठ्यांचा आदर
चाणक्य म्हणतात, माणसाचे चारित्र्य काचेच्या भांड्यासारखे असते. काचेच्या भांड्याला एकदा तडा गेला की ते पुन्हा कधीही दुरुस्त होत नाही. तसेच माणसाच्या चारित्र्यालाही एकदा तडा गेला की पुन्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे चारित्र्य जपणे महत्त्वाचे असल्याचे चाणक्य सांगतात.
आयुष्यात अनेकदा माणसाची परीक्षा पाहणारे प्रसंग येतात आणि कठीण काळ येतो. अशा अवस्थेत माणसाने कायम संयम ठेवला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. कोणतीही वेळ कायम बसून राहत नाही. सावलीनंतर ऊन आणि उन्हानंतर सावली, हा खेळ निरंतर सुरूच असतो. त्यामुळे माणसाने नेहमी संयम ठेवला पाहिजे.
चाणक्य म्हणतात, माणसाने नेहमी थोरा-मोठ्यांचा आदर करायला शिकले पाहिजे. या लोकांनी त्यांच्या आयुष्यात खूप चांगले आणि वाईट अनुभव घेतलेले असतात. त्यांच्याकडून शिकल्यास नक्कीच प्रगती होते, असे चाणक्य सांगतात.
कष्ट आणि अहंकाराचा त्याग
चाणक्य म्हणतात, कष्टाला कधीही लाजू नका. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती जेवढे जास्त कष्ट करेल, तेवढा तो अधिक यशस्वी होईल. त्याचे क्षेत्र कोणतेही असू द्या, असे चाणक्य म्हणतात.
माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि शांती हवी असेल, तर त्याने अहंकार सोडून द्यावा, असे चाणक्य सांगतात. या चार गोष्टी लक्षात ठेवल्यास माणसाचे जीवन अधिक सुखी आणि सुंदर होऊ शकते, असा संदेश चाणक्य नीतीतून मिळतो.
टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply