जळगाव जिल्ह्यातील आदिवासी गावे आणि पाड्यांपर्यंत पिण्याचे पाणी, वीज, रस्ते आणि शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचवणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी पाडे आणि वस्त्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून या योजना राबवण्यात येणार आहेत.
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कार्यक्रम
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव सेवा सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. या वेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी अरुण पवार आणि सह प्रकल्पाधिकारी प्रवीण दाभाडे उपस्थित होते.
सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा
रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील सुमारे 70 आदिवासी गावे व पाड्यांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अद्याप वीजपुरवठा नसलेल्या अतिदुर्गम गावे व पाड्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प राबवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply