ठाण्यातील रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांचा विशेष गौरव व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांना प्रोत्साहनपर एक वेतनवाढ द्यावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
रहेजा गार्डन येथील कार्लाइन इमारतीत ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना धीर दिला. इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने लिफ्टचा वापर करणे अशक्य झाले होते.
शिड्या आणि स्ट्रेचरच्या साह्याने बचावकार्य
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शिड्या व स्ट्रेचरच्या साह्याने ५० रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. रहिवाशांसोबतच त्यांच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांनाही जवानांनी सुखरूप बाहेर काढले. अनेक तास अथक परिश्रम घेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी जीवितहानी टाळली.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानांच्या शौर्याचे आणि कर्तव्यदक्षतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी कौतुक केले होते. त्यांच्या असामान्य कामगिरीची योग्य दखल घेऊन त्यांना एक वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.
मनोबल वाढेल, असा विश्वास
या निर्णयामुळे जवानांच्या कार्याचा सन्मान होण्याबरोबरच भविष्यात आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि काम करण्याचा उत्साहही वाढेल, असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply