दिवाळीच्या सुट्ट्यांचा लाभ घेत लाखो भाविक सप्तशृंगगडावर दर्शनासाठी येत आहेत. चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच गडाला आता दिवाळी यात्रेचे स्वरूप आले आहे. वणी येथील आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून, गेल्या तीन दिवसांत अडीच लाख भाविकांनी गडावर हजेरी लावली आहे. शुक्रवारी दिवसभरात एक लाखांहून अधिक भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले.
खानदेशातून गुजरातमध्ये स्थायिक झालेले भाविक तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील भाविक दिवाळीच्या सुट्टीचा योग साधून दर्शनासाठी येत आहेत. भाऊबिजेनंतर बुधवारपासून गडावर गर्दी वाढत आहे. २४ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा साईबाबांचा जन्मदिन म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे दरवर्षी दिवाळी संपताच गुजरातमधील हजारो भाविक वाहनाने आणि पदयात्रेने शिर्डीकडे जातात. ते प्रथम सप्तशृंगीचे दर्शन घेऊन शिर्डीकडे मार्गस्थ होत आहेत. ‘अंबे माते की जय’ असा जयघोष करीत भाविक तीन ते चार तास प्रतीक्षा करून दर्शन घेत आहेत.
न्यासाच्या प्रसादालयात चार दिवसांत सुमारे तीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गर्दीमुळे ट्रस्टची धर्मशाळा आणि भक्तनिवास भरले असून, खासगी निवासस्थानेही पूर्ण भरली आहेत. भाविकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी न्यासाची प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था कार्यरत आहे. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे स्वतः उपस्थित राहून व्यवस्थेवर लक्ष ठेवत आहेत.
वाहतूक कोंडी आणि भाविकांची गैरसोय
गडावरील भाविकांची संख्या पाहता एसटी व्यवस्थापनाने दिवाळी सुट्टीनंतरही अतिरिक्त बसेसचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र भाविकांची संख्या जास्त असल्याने एसटीचे नियोजन अपुरे पडत आहे. रात्रीच्या वेळी गुजरात आणि राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. याचाच फायदा खासगी वाहनधारक घेत असून, भाविकांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन असुरक्षित प्रवास करावा लागत आहे.
फनिक्युलर ट्रॉलीतून दर्शनाला जाण्यासाठीही चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी पायऱ्या चढून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या पायरीजवळील गर्दी पाहून अनेकांनी पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन माघारी फिरणे पसंत केले. रोपवेची लांबलेली प्रतीक्षा, वाहन पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
सुरक्षेची तपासणी
सप्तशृंगगडाला धमकीचा ई-मेल आल्याची घटना समोर आल्यानंतरही भाविकांच्या श्रद्धेत कोणतीही कमतरता दिसून आली नाही. भाविकांनी मोठ्या संख्येने गडावर हजेरी लावली. ट्रस्ट आणि पोलिस प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवात गडावर खासगी वाहनांना बंदी असते, त्यामुळे कोंडी होत नाही. मात्र इतर वेळी वाहने थेट नेण्याची परवानगी असल्याने गडावर खासगी वाहनांची गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply