लातूर येथे लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात घेण्यात आलेला बसव-देशिकेंद्र स्वरमहोत्सव सुरेल स्वरांनी रंगला. भक्ती, वचन आणि शास्त्रीय संगीताचा सुरेल त्रिवेणी संगम असलेल्या या महोत्सवाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
महोत्सवाचे उद्घाटन पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी लिंगायत शरण फाउंडेशनचे अध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर, शिरीष उटगे, तुकाराम पाटील, राम बोरगावकर आणि उज्ज्वला भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भावगीते आणि भक्तिगीतांनी रंगले सादरीकरण
महोत्सवात दीपिका गीते-डिगोळे यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू’ आणि ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला’ ही भावगीते, तर ‘माझे कोण आहे तुजविण देवा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका’ आणि ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ ही भक्तिगीते सादर केली.
भार्गवी काशीद हिने सादर केलेल्या सुरेल नाट्यगीताला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर गायक प्रा. विजयकुमार धायगुडे यांनी दमदार आवाजात छोटा ख्याल सादर केला आणि ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘कानडा राजा पंढरीचा’ व ‘जगत में झूटी देखी प्रीत’ ही एकापेक्षा एक सरस गीते सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. भैरवीने गायनाची सांगता केली.
साथसंगत आणि आयोजन
गणेश सुतार व संतोष थोरात यांनी हार्मोनियमवर, परमेश्वर पाटील यांनी तबल्यावर, महेश वंगवाड यांनी पखवाजवर, तर कल्याण पाटील यांनी तानपुऱ्यावर साथ केली. गुरू बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे मुख्य संघटक इराना पावले, सिद्राम डोंगरगे, विजयकुमार गुत्ते, राजेश विभुते, शेखर हविले, प्रा. नागेश सुगरे आणि शिवानंद मिटकरी आदींनी पुढाकार घेतला होता.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply