मालेगावात दिवाळी सणानिमित्त येथील आगारातील एसटीच्या चालक आणि वाहकांना रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. समाजातील सर्वजण आपापल्या घरी आनंदाने सण साजरा करत असताना एसटीचे चालक आणि वाहक मात्र भावाला बहिणीकडे आणि बहिणीला भावाकडे नेण्याचे काम दिवाळीत एकही दिवस सुट्टी न घेता अखंडितपणे करीत असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून गेल्या २६ वर्षांपासून रोटरी मिडटाऊनच्या वतीने मिठाई आणि फराळ वाटप केले जाते.
ही परंपरा कायम ठेवून यंदाही क्लबतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. यंदा मालेगावच्या नवीन बसस्थानक येथे फराळ आणि मिठाईची पाकीटे चालक आणि वाहकांना वितरित करण्यात आली. याप्रसंगी मामको बँकेचे अध्यक्ष भिका कोतकर यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सचिव राहुल कदम, राजेंद्र भामरे, सतीश कलंत्री, प्रकल्प अध्यक्ष दिनेश सोनवणे, गणेश बोरसे आणि आगार व्यवस्थापक विजय पाटील उपस्थित होते.
२६ वर्षांची अखंड परंपरा
यावेळी भिका कोतकर, विजय पाटील आणि सतीश कलंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रोटरी मिडटाऊनच्या वतीने दरवर्षी होत असलेल्या या उपक्रमामुळे सर्व चालक आणि वाहकांना प्रचंड समाधान आणि आनंद मिळत असल्याचे आगार व्यवस्थापक पाटील म्हणाले. क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी २६ वर्षे क्लबच्या माध्यमातून अखंडितपणे बस चालक आणि वाहकांना मिठाई व फराळ वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply