मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवरून शुक्रवारी सभागृहात मोठा गदारोळ झाला. ही तत्त्वे सर्वांची दिशाभूल करणारी असून ती आपल्याला मान्य नसल्याची ठाम भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद हुसेन यांनी सभागृहातच मार्गदर्शक तत्त्वांची नियमावली फाडून टाकली.
गेल्या महिन्यात झालेल्या महासभेतही गोंधळ झाल्याने सभा तहकूब करावी लागली होती. त्यानंतर महापौर डिंपल मेहता यांनी सभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आणि शुक्रवारी झालेल्या तहकूब महासभेपासून त्यांची अंमलबजावणी सुरू केली.
प्रवेशावर निर्बंध, कसून तपासणी
नियमावलीनुसार महासभेसाठी येणाऱ्या नागरिक आणि पत्रकारांवर प्रवेशाचे निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारी महापालिका मुख्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. नगरसेवकांसह नागरिक आणि पत्रकारांची कसून तपासणी करूनच त्यांना सभागृहात सोडण्यात आले.
महासभा सुरू होताच विरोधी पक्षांनी या नियमावलीवर जोरदार आक्षेप घेतला. या नियमावलीला कायदेशीर आधार काय आहे, ती निष्पक्ष पद्धतीने तयार करण्यात आलेली नाही, नियमावली तयार करण्याचा अधिकार महासभेलाच आहे आणि ती पुन्हा महासभेपुढे आणून त्यावर चर्चा व्हावी, असे मुद्दे विरोधी पक्षांनी मांडले.
प्रशासनाची भूमिका काय?
ही नियमावली महापौरांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तयार करण्यात आली आहे, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त सचिन बांगर यांनी सभागृहात केला. स्थायी समितीचे सभापती हसमुख गेहलोत यांनीही नियमावलीचे समर्थन केले. ही नियमावली सर्वांच्या सोयीसाठी असून सभागृहाचे कामकाज सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने चालावे यासाठी ती तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षांनी आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply