जळकोट तालुक्यात उत्साह आणि मांगल्याच्या वातावरणात दिवाळीच्या प्रकाशपर्वाची सांगता बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या सणाने झाली. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह होता. घरोघरी लावलेल्या पणत्या, विद्युत रोषणाई, आकाशकंदील, रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळाच्या गोडव्यामुळे संपूर्ण तालुका दीपोत्सवाच्या रंगात रंगून गेला होता.
तालुक्यात दुष्काळी स्थिती असतानाही नागरिकांनी आर्थिक अडचणींवर मार्ग काढत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच नवीन कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य, पणत्या, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी केली. शहरासह ग्रामीण भागात घरोघरी आकर्षक आकाशकंदील आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत धनधान्याची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
भाऊबीजेनंतर परतीचा प्रवास
दिवाळीच्या फराळात चकली, करंजी, लाडू, अनारसे आणि चिवडा यांसह विविध पदार्थांचा आस्वाद घेत नातेवाईक आणि मित्रमंडळींनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. भाऊबीजेचा सणही उत्साहात साजरा झाला. बहिणींनी भावांना औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धीची प्रार्थना केली, तर भावांनी बहिणींना भेटवस्तू दिल्या. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेले भाऊ-बहिणी एकत्र आल्याने घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आता दिवाळीसाठी मोठ्या आनंदाने सासरहून माहेरी आलेल्या लेकीबाळी परतीच्या मार्गावर आहेत. जाताना त्यांचे डोळे पाणावत आहेत. मामा-भाच्चे संवादही थंडावला आहे. सुटीसाठी गावाकडे आलेले अनेक तरुण आणि लेकीबाळी आता भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांकडे मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळीचा आनंद ओसरल्याचे चित्र आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply