निंभोरा (ता. रावेर) येथे संवेदना दिवाळी उपक्रमांतर्गत झालेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आठवडे बाजार चौकात झालेल्या या कार्यक्रमात तीन महिला विजेत्या ठरल्या. दुष्काळाच्या चिंतेने ग्रासलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना दिवाळीच्या आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यंदाची दिवाळी : माणुसकीची दिवाळी – संवेदना दिवाळी हा उपक्रम राबविण्यात आला.
तीन महिला विजेत्या
या कार्यक्रमात एलईडी टीव्हीचे प्रथम बक्षीस सोनाली कोळंबे यांनी, मिक्सर ग्राइंडरचे द्वितीय बक्षीस जागृती सोनवणे यांनी आणि कुकवेअर सेटचे तृतीय बक्षीस शीतल तायडे यांनी जिंकले. यावेळी ६४ महिलांना निंभोरा गाव सेवा समितीतर्फे सेमी पैठणी भेट देण्यात आली. कमल पवार (वय ९०), गुंफाबाई बोंडे (७५) आणि दीड महिन्याच्या बाळासह धनश्री राणे आदी महिलांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मान्यवरांची उपस्थिती
आमदार नंदकिशोर महाजन अध्यक्षस्थानी होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा विभागाच्या जिल्हाध्यक्षा तथा निंभोरा गाव सेवा समितीच्या युवा संयोजिका भाग्यश्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. होम मिनिस्टरचे संयोजक शुभम म्हस्के (पुणे) यांनी कौशल्यपूर्ण सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.
Leave a Reply