वणी येथील श्री गुरुदत्त बिगरशेती सहकारी पतसंस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोखपाल म्हणून कार्यरत असलेले भास्कर पोपट भोये (५२, रा. भातोडे, ता. दिंडोरी) यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १०) घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात आहे की आत्महत्या, याबाबत वणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ऐन दीपावलीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे भातोडे गावासह वणी परिसरात शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सकाळपासूनचा घटनाक्रम
वणी पोलिसांत दाखल माहितीनुसार, भास्कर भोये मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातील कांदा व टोमॅटो पिकांना पाणी भरण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलाने शेतात जाऊन शोध घेतला. ते आढळून न आल्याने नातेवाइकांच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास गावकऱ्यांना त्यांच्याच गट क्रमांक १३२ मधील विहिरीत भास्कर भोये यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. पोलीस, पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीबाहेर काढण्यात आले. मुलगा रोशन भास्कर भोये यांच्या माहितीनुसार पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
२५ वर्षांची सेवा
भास्कर भोये हे वणी येथील श्री गुरुदत्त बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल २५ वर्षांपासून रोखपाल (कॅशियर) म्हणून कार्यरत होते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply