हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भारतात गेली सहा दशके सुरू असलेल्या कामाचा जागतिक स्तरावर आढावा घेण्याची संधी उरुळी कांचन येथील बायफ विकास संशोधन प्रतिष्ठानला मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक आराखडा कराराअंतर्गत मान्यताप्राप्त संस्था म्हणून बायफ तुर्कस्तान येथील अंटालिया शहरात ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३१ व्या जागतिक हवामान परिषदेत सहभागी होऊन शुक्रवारी (ता. १३) आपले संशोधन सादर करणार आहे.
शिष्टमंडळात कोण?
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, ग्रामीण उपजीविकेत सुधारणा करणे आणि हवामान बदलाला तोंड देण्याची गावांची क्षमता वाढवणे, हेच बायफच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. हेच कार्य आणि अनुभव बायफचे तज्ज्ञ जगासमोर मांडणार आहेत. या परिषदेसाठी बायफच्या शिष्टमंडळात डॉ. मनोजकुमार आवारे (पशुधन पोषण व हवामान बदलाचे शमन), डॉ. दिनेश सादुरे (हवामान अनुकूल शेती) आणि महेश लाडे (नवीकरणीय ऊर्जा) यांचा समावेश आहे. हे तज्ज्ञ हवामान अनुकूल शेती, मिथेन उत्सर्जन व्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत ग्रामीण उपजीविका या विषयांवर सादरीकरण करणार आहेत. जगभरातील संस्था, तज्ज्ञ आणि भागधारकांशी चर्चा करून भारतातील ग्रामीण हवामान कृती अधिक प्रभावी करण्यासाठी सहकार्याच्या नव्या संधी शोधल्या जाणार आहेत.
वाडी मॉडेल आणि नवीकरणीय ऊर्जा
बायफने विकसित केलेले वाडी मॉडेल म्हणजेच कृषी, फलोत्पादन आणि वनीकरण यांचा एकत्रित प्रयोग दुष्काळी भागातही यशस्वी ठरला आहे. गवताळ कुरणांचे पुनरुज्जीवन, पुनरुज्जीवनात्मक शेती आणि निसर्गाधारित उपाययोजना देशातील ९७ हजार हेक्टरपेक्षा अधिक नापीक आणि पड जमिनीवर राबवण्यात आल्या आहेत. या कामामुळे जमिनीचे आरोग्य सुधारले असून सुमारे २२.४ लाख टन कार्बनचे शोषण आणि साठवण झाली आहे. शेतीची उत्पादकता वाढली असून शेतकऱ्यांचा महागड्या खतांचा खर्चही कमी झाला आहे. पाणलोट विकास, पावसाचे पाणी अडवणे, भूजल पुनर्भरण आणि मृद-जलसंधारणामुळे गावांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे जमीन हवामान बदलाशी जुळवून घेण्यास अधिक सक्षम झाली आहे. शेतात सौर ऊर्जा, गावात स्वच्छ ऊर्जा या दिशेनेही बायफने नवा प्रयोग केला आहे. कृषी-सौर ऊर्जा आणि विकेंद्रित ऊर्जा प्रणालींमुळे शेतात पीक घेतानाच सौर ऊर्जा निर्मिती करणे शक्य झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply