पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आजरा पंचायत समितीमध्ये दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकरी आणि ग्रामस्थांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रभारी सभापती यशोदा पोवार यांनी केले. ग्रामपंचायतींनी नळजोडण्यांना तोट्या बसवाव्यात आणि कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
विभागांचा आढावा
बैठकीत पाटबंधारे, वीज वितरण, वनविभाग, कृषी आणि पशुसंवर्धन या विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत आणि तालुकाध्यक्ष युवराज पोवार यावेळी उपस्थित होते.
जलजीवन मिशनअंतर्गतच्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याचे देसाई यांनी सांगितले. या योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी ठेकेदारांना विनंती करण्यात आली असून, विंधनविहिरींच्या अधिग्रहणाबाबत आणि कूपनलिकांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे आणि वीज वितरण विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
पाणीसाठा आणि चाऱ्याची स्थिती
पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य आबिटकर यांनी सांगितले की, हिरण्यकेशी आणि चित्रा नदीवरील ३२ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा करण्यात आला आहे. चित्रीवर आजरा आणि गडहिंग्लजमधील ७२ ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. वनपरिक्षेत्रात लोकसहभागातून ४८ वनराई बंधारे बांधण्यात आले असून, मार्चपर्यंत पाणीसाठा राहील, अशी माहिती वनाधिकारी सचिन सावंत यांनी दिली. वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका काढण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यात ४३ हजार ३२७ पशुधन असून, ५६ हजार टन चारा उपलब्ध आहे. चाऱ्यासाठी ६ हजार ६०० किलो मका आणि ज्वारी बियाण्याचे वाटप केले जाणार असल्याचे सहायक आयुक्त पी. सी. मुत्तेफोड यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सतीश केदार यांनी अहवाल सादर केला. गटविकास अधिकारी सावंत, कृषी अधिकारी दिनेश शेटे आणि युवराज पोवार यांनीही सूचना मांडल्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply