दिवाळी म्हटली की दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि फटाक्यांची आतषबाजी हे समीकरण ठरलेलेच असते. यंदाच्या दिवाळीत खारघर परिसरात अंदाजे दीड कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दुकानांवर ग्राहकांची गर्दी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खारघर सेक्टर १५ मधील डी मार्टसमोरील मैदानात ४९, उत्सव चौकात १५ दुकाने थाटण्यात आली होती. याशिवाय काही दुकानांमध्ये छुप्या पद्धतीनेही फटाक्यांची विक्री करण्यात आली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये फटाके खरेदी करण्याचा उत्साह दिसून आला. विविध प्रकारचे फटाके, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी फुलबाज्या, अनार, चक्री, रॉकेट आणि शोभेच्या आतषबाजीच्या साहित्याला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळाली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तसेच दिवाळीच्या मुख्य सणाला सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक सोसायट्या, गृहनिर्माण संकुले आणि मोकळ्या मैदानांच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
प्रदूषणाची चिंता, विक्रेत्यांना चांगला व्यवसाय
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दिवाळीनंतर काही भागांत फटाक्यांचा कचरा आणि धूर दिसून आला. त्यामुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासोबतच सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खारघरमधील प्रत्येक फटाकाविक्रेत्याने साधारण दोन ते अडीच लाख रुपयांचे फटाके खरेदी केले होते. फटाक्यांच्या दरात यंदा १५ टक्के वाढ झाली होती, तरीही व्यवसाय चांगला झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply