क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रात १८ नोव्हेंबरपर्यंत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार आणि सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिन जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबिरे आणि सन्मान सोहळे
या सप्ताहात उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यात येणार आहे. सिकलसेल रुग्णांसाठी विशेष शिबिर घेण्यात येणार असून जन्मदाखल्याअभावी आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहादा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी महापुरुषांची स्मारके आणि सार्वजनिक ठिकाणी स्थापित पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल. स्मारकस्थळी दीपोत्सव आयोजित केला जाईल आणि आदिवासी अस्मितेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसाठी तालुका समन्वय अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येईल. आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात येणार आहे. २०२५-२६ मधील राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत एका पात्र महिला बचत गटास सात लाख ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. आदिवासी कलाकारांचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात येतील, आदिवासी वैदू-भगत यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देण्यात येतील, वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा व ८-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात येईल आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात येईल.
सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील पालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विशेष सेवा शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर होणार असून बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply