धारावीतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी खड्ड्यांत राडारोडा टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर पायी चालणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळा संपूनही दुरुस्ती नाही
पावसाळा संपून जवळपास महिना उलटला आहे. पावसाळ्याच्या काळात रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास स्थानिकांनी सहन केला होता. त्या काळात खड्डे बुजवले जात नसल्याने पावसाळ्यानंतर तरी रस्ते दुरुस्त होतील, अशी आशा स्थानिकांना होती. मात्र ती आशा फोल ठरली. पावसाळ्यात काही ठिकाणी केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.
गणेशोत्सव आणि देवीच्या आगमन-विसर्जनाच्या वेळीही याच खड्ड्यांमधून मिरवणुका काढाव्या लागल्या होत्या. त्या वेळी स्थानिक मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते. तरीही महापालिकेने तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कारभारामुळे धारावीकरांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
नूतनीकरणाची मागणी
दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोच, पण पावसाळा संपल्यानंतरही तोच त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे धारावीच्या रस्त्यांची रया गेली आहे. महापालिकेने लवकरात लवकर रस्त्यांची डागडुजी आणि नूतनीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धारावीत गेल्या अनेक वर्षांपासून नव्याने रस्ते बनवले जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जुन्या रस्त्यांची केवळ डागडुजी केली जात असल्याने रस्ते वारंवार खराब होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चांगले रस्ते कधी मिळतील, याची वाट पाहण्याशिवाय सध्या नागरिकांकडे पर्याय उरलेला नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply