अंबरनाथमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी रस्त्यावर ही घटना घडली. दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला.
काय घडले?
भावेष गंगाधर पतंगे (वय २१) हा आपला मित्र मोनिष पद्मनाथ पुजारी (वय २७) याच्यासह बुधवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून जात होता. लोकनगरी मैदानाजवळील पेट्रोलपंपासमोर रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला त्यांची दुचाकी धडकली. या धडकेत भावेषला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोनिष यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्ता अरुंद, पथदिव्यांचा अभाव
लोकनगरी रस्ता अरुंद असून या मार्गावर पथदिव्यांचा अभाव आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते, अशी स्थानिकांची तक्रार आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि पुरेसे पथदिवे बसवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply