क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी वडगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी पांचाळ, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष विक्रम हेमाडे आणि वडेश्वर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संजय निकम उपस्थित होते. या वेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची तसेच सेवा सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप
शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी आदिवासी बांधवांना रसवंती गृह, शेळीपालन, किराणा दुकान, कुक्कुटपालन आणि पिठाची गिरणी आदी वैयक्तिक योजना तसेच सामूहिक लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे.
१४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रम
क्रांतिकारकांच्या स्मारकांची स्वच्छता मोहीम आणि दीपोत्सव, जनजातीय गौरव दिन, घोडेगाव येथील पृथ्वी मंगल कार्यालयात आदिवासी समाजाचा मेळावा, त्यानिमित्त रानभाजी महोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आधार कार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी लागणारे पुरावे यांचे शिबिर, शिरूर येथे आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर, आदिवासी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण दिन तसेच जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा सांगता सोहळा असे कार्यक्रम १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply