सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धरणे ९२ टक्क्यांवर भरलेली; तरीही पाण्याची बचत करा

नाशिक जिल्ह्यातील धरणे ९२.७४ टक्के भरलेली असून, २६ धरणांत ६५,४९१ दलघफू पाणीसाठा आहे. टंचाई लक्षात घेऊन पाण्याची बचत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धरणे ९२ टक्क्यांवर भरलेली; तरीही पाण्याची बचत करा

नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात एकीकडे टँकरचा फेरा सुरू झाला असताना प्रमुख धरणांमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. सद्यस्थितीत धरणे ९२.७४ टक्के भरलेली असली तरी येत्या काळातील टंचाईचे संकट विचारात घेता प्रत्येकाने आत्तापासूनच पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चालूवर्षी पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. संकटाच्या या काळात जिल्ह्यातील चार तालुक्यात सध्या ३७ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, एकीकडे टँकरचा फेरा सुरू झालेला असताना जिल्ह्यातील प्रमुख २६ धरणांमध्ये सध्या एकत्रितरीत्या ६५ हजार ४९१ दलघफू एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीशी तुलना केल्यास यंदा धरणांमध्ये दोन टक्क्यांनी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

नाशिककरांना पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणासह समूहात ९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचवेळी दारणा समूहात ९० टक्के साठा शिल्लक आहे. याव्यतिरिक्त ओझरखेड व पालखेड समूहात अनुक्रमे ९२ तसेच ९५ टक्के पाणी आहे. गिरणा खोऱ्यातील धरणेही ९० टक्क्यांच्या वर भरलेली आहेत. तूर्तास जिल्हावासियांच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. मात्र, एल निनोचा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. परिणामी या कालावधीत उष्णतेत अधिक वाढ होताना धरणांतील बाष्पीभवनाचा वेगही वाढू शकतो.

धरणनिहाय पाणीसाठा

गंगापूर ४९६५, दारणा ६७७९, काश्यपी १८२०, गौतमी गोदावरी १८३४, आळंदी ७४०, पालखेड ५०४, करंजवण ५२०५, वाघाड २२०३, ओझरखेड २०१६, पुणेगाव ५२७, तिसगाव ४२१, भावली १४१८, मुकणे ५६८६, वालदेवी १०८०, कडवा १६२५, नांदुरमध्यमेश्वर १५७, वाकी २३१०, भाम २४४९, भोजापूर ३२५, चणकापूर २३८९, हरणबारी १०९६, केळझर ५४३, गिरणा २१८९०, पुनद १३०३ आणि माणिकपुंज २३४ दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी शासन व प्रशासनाच्या स्तरावर आत्तापासूनच नियोजन केले जात आहे.

एल निनोचा प्रभाव फेब्रुवारीपर्यंत

येऊ घातलेले संकट लक्षात घेता सर्वसामान्यांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नागरिकांना अखंड व सुनिश्चित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पण, संभाव्य टंचाईचे संकट लक्षात घेता जिल्हावासियांनी पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करतानाच त्याचा काटकसरीने वापर करावा.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance