छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे भाव कमी झाले आहेत. कोथिंबीर वीस रुपये, तर मेथी पंधरा रुपये जुडीने मिळत आहे. चुका, शेपू, पालक, करडी आणि तांदुळजा या पालेभाज्या दहा ते पंधरा रुपये जुडीने विकल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत ग्राहकांचा कल स्वस्त पालेभाज्यांकडे वळला आहे.
फळभाज्या महाग, गृहिणींचे गणित बिघडले
शहरातील किरकोळ बाजारात मागील महिनाभरापासून फळभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी आणि शहानूरमिया दर्गा येथील बाजारात भाव पुन्हा वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. दिवाळीत कांदा सत्तर रुपये किलोवर पोहोचला असून, लसूण चारशे रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. लिंबाचे भाव दोनशे रुपयांवरून खाली येऊन एकशे साठ रुपयांवर स्थिरावले आहेत. भेंडी, गाजर, कारले, वाल, गिलके, हिरवी मिरची आणि सिमला मिरची यांसाठी किलोमागे ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत.
आजचे भाव (प्रतिकिलो)
बटाटे पंचवीस ते तीस रुपये, कांदा साठ ते सत्तर रुपये, टोमॅटो चाळीस ते पन्नास रुपये, भोपळा पन्नास रुपये, काकडी साठ रुपये, वांगे साठ रुपये, कोबी चाळीस रुपये, तर फ्लॉवर साठ रुपये किलोने मिळत आहे. लसूण अडीचशे ते चारशे रुपये, आले दोनशे रुपये, शेवगा शंभर ते एकशे वीस रुपये, श्रावण घेवडा एकशे वीस रुपये, दिलपसंद शंभर रुपये, तर दोडके ऐंशी रुपये किलोने विकले जात आहे. बटाट्याचे भाव तुलनेने स्थिर असून, स्वस्त पर्याय म्हणून बटाटा आणि कोबीला ग्राहकांची पसंती मिळत असल्याची माहिती औरंगपुरा भाजीमंडईतील विक्रेते संजय वाघमारे यांनी दिली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply