जुन्नर तालुक्यातील ओतूरजवळच्या बनकरफाटा मजूर अड्ड्यावर शेतमजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्या पुरुष मजुरांना दिवसाला ९०० ते १००० रुपये, तर महिला मजुरांना ८५० ते ९५० रुपये रोजंदारी मिळत आहे. त्यामुळे मजुरांच्या घरात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. मात्र याच काळात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, तालुक्यात ‘मजूर जोरात, शेतकरी कोमात’ असे चित्र दिसत आहे.
कामांची रेलचेल, मजुरांना शाश्वत रोजगार
परिसरात सध्या कांदा लागवड, निंदणी, रोपे उपटणे आणि आगात कांद्याची खुरपणी या कामांना वेग आला आहे. त्याशिवाय फुलशेती, बीट काढणी आणि भाजीपाला तोडणीसाठीही मजुरांची मोठी मागणी आहे. कोबी, फ्लॉवर, काकडी, पावटा आणि वाल काढणीची कामे एकाच वेळी सुरू असल्याने मजुरांच्या हाताला सातत्याने काम मिळत आहे.
शेतकऱ्यांसमोर वाढता खर्च, पडलेला भाव
शेतीमध्ये यांत्रिकीकरण आले असले, तरी कांदा लागवड आणि भाजीपाला काढणीसारखी कामे अजूनही मजुरांशिवाय होत नाहीत. मजुरीसोबतच खते, औषधे आणि बियाण्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. दुसरीकडे शेतीमालाला मिळणारा बाजारभाव घसरल्याने उत्पादन खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे मजुरांची दिवाळी गोड झाली असली, तरी शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक संकटाच्या सावटाखाली साजरी होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply