पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या आठ महिन्यांत सहा कोटी रुपयांच्या विकासकामांना मूर्त स्वरूप आले आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांपलीकडे जाऊन विकासकामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभाला जोडणारी जलवाहिनी नव्हती; त्या कामाचा श्रीगणेशा झाल्याने विशेषतः चिंचखेड रस्त्यावरील नागरिकांना नळजोडणी देऊन मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे.
भूमिपूजनप्रसंगी उपस्थित मान्यवर
चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभ ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपळगाव नगर परिषदेला भरघोस निधी येत असल्याचे सांगितले. या वेळी विश्वासराव मोरे, साहेबराव मोरे, नामकोचे उपाध्यक्ष संदीप सुराणा आणि राष्ट्रवादीचे गटनेते गणेश बनकर उपस्थित होते.
आणखी विकासकामे मार्गी
उपनगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले, की पिंपळगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभाग चारपासून सुरू झालेल्या विकासकामांचा झंझावात सर्वदूर पोहोचत आहे. घनकचरा प्रकल्पाला सात कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच त्या कामालाही सुरुवात होईल. राज्य शासनाकडून वीस कोटी रुपये विविध विकासकामांसाठी मंजूर झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे म्हणाले, की पिंपळगाव शहराला इंदूर शहरासारखे स्वच्छ व सुंदर करण्याच्या संकल्पाकडे वाटचाल सुरू झाली आहे. चिंचखेड रस्त्यावरील जलकुंभाला जोडणाऱ्या जलवाहिनीमुळे परिसरातील नागरिकांची तहान भागवली जाणार आहे. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेनेचे युवानेते राजेश पाटील आणि किरण लभडे यांनी दिवाळीला विकासाची गोड भेट पिंपळगावकरांना दिली, असे सांगण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply