जळगाव शहरालगतच्या कोल्हे हिल्स परिसरातील वनविभागाच्या डोंगराला रविवारी दुपारी अचानक आग लागली. डोंगरावरील कोरड्या गवताने पेट घेतल्याने आग काही मिनिटांतच मोठ्या परिसरात पसरली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.
कोल्हेनगर परिसरात पठाण बाबा दर्ग्यामागील वनविभागाच्या डोंगराला दुपारी अडीचच्या सुमारास आग लागल्याचे समजते. डोंगराळ भागातील गवत पूर्णपणे कोरडे झाल्यामुळे आगीने झपाट्याने परिसर व्यापला. परिसरातील तरुणांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.
## दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण
महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. सुमारे दोन तासांच्या परिश्रमांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविता आले.
## जैवविविधतेला फटका
कोल्हे हिल्स परिसरातील डोंगराळ भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरपटणारे प्राणी, पक्षी आणि बिळात राहणारे जीव वास्तव्य करतात. आगीच्या या घटनेत या जैवविविधतेचे नुकसान झाले असून, काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या परिसरात दरवर्षी आग लागण्याच्या घटना घडत असल्याचेही समोर आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply