काळेवाडीतील तापकीर मळा रस्त्यावर अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत उभी असलेली वाहने नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहेत. रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेली ही वाहने वाहतुकीच्या वाटेत येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात रहिवासी आणि व्यावसायिकांची मोठी वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचारी यांची या मार्गावर सतत ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या कडेला अनेक दिवसांपासून तीच वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याने रस्त्याचा पूर्ण वापर वाहनचालकांना करता येत नाही. काही वाहने वापरात नसल्याचे स्पष्ट दिसते आणि त्यांची देखभालही केली जात नसल्याचे चित्र आहे.
वाहतुकीला अडथळा आणि अपघाताचा धोका
समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देताना दुचाकीस्वारांची कसरत होते. रात्रीच्या वेळी अंधारात उभी असलेली वाहने वेळेवर लक्षात आली नाहीत, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्याने रस्ता अरुंद होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे अवघड झाले आहे. ही वाहने वापरात आहेत की नाही, याची कोणालाही माहिती नसल्याने रस्त्याची जागा विनाकारण अडवली जात आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांची मागणी; पोलिसांचे आश्वासन
संबंधित वाहनांची माहिती घेऊन मालकांना नोटिसा द्याव्यात, वाहने हटवावीत आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने आधीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बेवारस वाहनांवर नियमित कारवाई सुरू असून अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून अशा वाहनांच्या मालकांना नोटिसा दिल्या जातील, असे सांगवी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी सांगितले. नागरिकांनी बेवारस वाहनांबाबत माहिती कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply