सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मोठ्या विकासकामांमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या नाशिक महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नगरविकास विभागाने २०२६-२७ साठी मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभारातून राज्यातील २८ महापालिकांना एकूण ४२१ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यात नाशिकच्या वाट्याला २१ कोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी आला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४९-अ नुसार शहरातील मालमत्तेच्या विक्री, देणगी आणि भोगवटा गहाण व्यवहारांवर मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार आकारला जातो. यातून जमा होणारी रक्कम संबंधित महापालिकांना अनुदान म्हणून दिली जाते. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीतूनच हा निधी वितरित करण्यात येणार आहे.
नाशिकला नेमकी किती रक्कम
नाशिक महापालिकेला २१ कोटी २५ लाख ६७ हजार २७६ रुपये मिळणार आहेत. शहरात सध्या रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे तिजोरीवर पडलेला ताण काही प्रमाणात या अनुदानामुळे हलका होणार आहे. मात्र हा निधी नेमका कोणत्या कामांवर खर्च होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महापालिकांना मिळालेले अनुदान
या वाटपात पुणे महापालिकेला १०९ कोटी ५४ लाख ६४ हजार ५७० रुपये, ठाण्याला ९६ कोटी २६ लाख ८० हजार ७८२ रुपये, पिंपरी-चिंचवडला ४७ कोटी ७३ लाख रुपये, वसई-विरार आणि नवी मुंबईला प्रत्येकी १७ कोटी ४७ लाख रुपये, तर मीरा-भाईंदरला १६ कोटी १३ लाख रुपये मिळाले आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply