रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा सिनेमा आला आहे. या सिनेमाला प्रचंड गर्दी होत आहे. या चित्रपटाने चांगली कमाईही केली आहे. पण ‘रामायणा’सारखा भव्यदिव्य विषय अवघ्या तीन तासांच्या सिनेमात दाखवणे सोपे नाही. भावना, व्यक्तिरेखेची प्रतिष्ठा आणि पौराणिक काळ मोठ्या पडद्यावर दाखवणे सोपे नाही. काही प्रमाणात रामायण सिनेमातील निर्माते आणि दिग्दर्शक या गोष्टी हाताळण्यात यशस्वी ठरले आहेत. तर काही ठिकाणी त्यांनी गंभीर चुका केल्या आहेत. या चुका अक्षम्य अशाच आहेत. ज्या गोष्टी मूळ कथेच्या आत्म्याशी निगडित आहेत, अशा गोष्टीच त्यातून गायब झाल्याचे दिसून आले आहे.
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात अनेक ठिकाणी असे वाटते की निर्मात्यांनी सीजीआय आणि व्हिज्युअल्सच्या नादात कहाणीच्या महत्त्वाच्या गोष्टीच सोडून दिल्या आहेत. सिनेमातील अनेक व्यक्तिरेखांचे चेहरे आणि लूक पाहिले तर त्यात तंत्रज्ञान प्रमाणापेक्षा अधिक वापरल्याचे दिसून येते. काही व्यक्तिरेखा कार्टुन वाटत आहेत. काहींचे हावभाव आणि संवादाचा मेळच बसत नसल्याचेही दिसते.
रावण आणि महादेवाचे नाते विसरले
रामायणात रावण केवळ एक शक्तिशाली राजा आणि खलनायक नाही. तर तो महादेवाचा निस्सीम भक्तही आहे. महादेवाची कठोर तपस्या करणारा, महादेवाप्रती समर्पित भावनेने पूजा करणारा राजा म्हणून रावणाला पाहिले जाते. पण सिनेमात रावणाची ही बाजूच आलेली नाही. या सिनेमात ब्रह्मा आणि विष्णूचे दर्शन होते. पण रावण आणि महादेवाचा संबंध पाहिजे तसा प्रभावशाली पद्धतीने मांडलेला नाही. महादेव भक्ती ही रावणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती, तीच या सिनेमातून गायब असून ही मोठी चूक असल्याचे लक्षात येते.
कुंभकर्ण, जंगलातील लढाई आणि इतर त्रुटी
कोणतीही ऐतिहासिक किंवा पौराणिक सिनेमा बनवताना त्यातील व्यक्तिरेखा या जिवंत वाटल्या पाहिजेत. छोट्या व्यक्तिरेखा असल्या तरी त्यांना न्याय दिला पाहिजे. पण रामायणात कुंभकर्णाची व्यक्तिरेखा अत्यंत विचित्र पद्धतीने दाखवली गेली आहे. कुंभकर्णाची भूमिका फैजल मलिकने साकारली आहे. पण त्याचा लूक गंभीर दिसण्याऐवजी कॉमेडी दिसत आहे. जणू काही आपण कुंभकर्णाच्या रूपात कार्टुन पाहतोय की काय असे वाटते. कुंभकर्ण हे रामायणातील विशाल आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. ती छाप या सिनेमात दिसत नाही.
राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात राक्षसांशी लढताना दाखवले आहेत. हे दृश्य प्रभावहीन झाले आहे. तिन्ही पात्रे जंगलात पळताना दिसत आहेत. त्यांच्या मागे राक्षसांचे सैन्य दिसत आहे. या संपूर्ण अॅक्शन सिक्वेन्समध्ये वास्तवता दिसत नाही. राक्षसांचा लूक आणि त्यांच्याशी होणारी लढाई अत्यंत नकली वाटते. हे दृश्य अत्यंत हास्यास्पद झाले आहे. समर प्रसंग असतो तेव्हा भीती आणि रोमांच उभा राहिला पाहिजे. पण यात सीजीआयची बनावटगिरी दिसत आहे.
या सिनेमात कैकयी वगळता दशरथांच्या इतर सर्व राण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या राण्यांच्या वाट्याला काहीच महत्त्वाचे संवाद नाहीत. तसेच महत्त्वाच्या भूमिकाही नाहीत. त्या केवळ स्क्रीनवर हसताना दिसत आहेत. केवळ राजमहालाची भव्यता दाखवण्यासाठीच या राण्यांना ठेवले की काय असे वाटते. या सिनेमात या राण्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या भावभावना दाखवण्याची आवश्यकता होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
या सिनेमात रकुल प्रीतने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील तिचा लूक आणि तिची उपस्थिती खटकते. शूर्पणखेला राक्षसीण दाखवण्याऐवजी तिला ग्लॅमरस अंदाजात अधिक दाखवले आहे. या संपूर्ण सिनेमात तिचा राक्षसी अवतार दिसत नाही. सिनेमात ती ग्लॅम डॉल वाटते. संपूर्ण रामायण जे घडले त्याला कारणीभूत शूर्पणखा आहे. त्यामुळे तिचे कॅरेक्टर यात अत्यंत महत्त्वाचे आहे. पण तिला पाहिजे तसे प्रभावशाली दाखवले नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply