उल्हासनगरमध्ये मेट्रो प्रकल्पानंतर आता शहाड पुलाच्या श्रेयावरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत जोरदार जुंपली आहे. धनत्रयोदशीच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. मेट्रोपाठोपाठ आता शहाड पुलावरूनही दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाजपचा दावा काय?
साडेतीनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित शहाड पुलासाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत उल्हासनगरकरांना मेट्रो देण्याचे आश्वासन दिले होते. याच भाषणाचा व्हिडिओ दाखवत आयलानी यांनी मेट्रो आणि शहाड पुलासाठी भाजपानेच पाठपुरावा केल्याचा दावा केला. उल्हासनगरमधील भाजप आणि शिवसेनेतील वादामागे एका गटाचे कारण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे प्रत्युत्तर
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळेच ही कामे होत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. केवळ कागदपत्रे दाखवून विकासकामे होत नाहीत, त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. भाजपाने स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे, दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, असे शिवसेना नेते कमलेश निकम म्हणाले.
यापूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्प पाचचे श्रेय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचे म्हटले होते. मात्र सर्वप्रथम मागणी केल्याचे श्रेय आपण जरूर घेणार, असे ते म्हणाले होते. न केलेल्या कामाचे खोटे बोलून श्रेय घेण्याची आपली सवय नसल्याची परखड प्रतिक्रिया देत त्यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे भाजप आमदार महेश चौघुले यांना टोला लगावला होता. धनत्रयोदशीच्या निमित्ताने शिवसेनेकडून ‘श्रीमती ज्योती कलानी लाडकी विद्यार्थिनी योजने’चा शुभारंभ करण्यात आला. याच कार्यक्रमात मेट्रो आणि शहाड पुलाच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप झाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply