नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे गावात आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते हे वाटप झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.
आरोग्यविषयक माहितीचे संकलन आणि डिजिटल नोंदींच्या माध्यमातून कामकाज अधिक प्रभावी करण्यावर यावेळी भर देण्यात आला. टॅबमुळे आशा कार्यकर्त्यांना गावपातळीवरील आरोग्य माहिती वेळेत आणि अचूक नोंदवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बचत गट महिलांशी संवाद
दौऱ्यादरम्यान डॉ. गेडाम यांनी बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, आर्थिक सहकार्याची गरज आणि स्वयंरोजगाराच्या संधी यावर चर्चा झाली. महिलांनी व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मदत आणि आर्थिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एका दिव्यांग पदवीधर महिलेने व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी केली. यावर बँकांशी समन्वय साधून निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन डॉ. गेडाम यांनी दिले.
शेतकऱ्यांना बियाणे, कापडी पिशवी विक्री केंद्र
पशुसंवर्धन विभागाच्या वैरण बियाणे वितरण योजनेंतर्गत १९ शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सीएसआर निधीतून उभारलेल्या कापडी पिशवी विक्रीच्या एटीएमचे उद्घाटनही यावेळी झाले.
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी महेश वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कांबळे, वाडीवऱ्हे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply