दिवाळीचा फराळ म्हटला की खमंग चकली आणि गोड लाडू यांच्यासोबत खुसखुशीत शंकरपाळी हमखास आठवते. प्रत्येक तुकड्याला खारीसारखे थर सुटावेत आणि तोंडात टाकताच ती विरघळावी, अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते. मात्र अनेकदा सगळी काळजी घेऊनही शंकरपाळी अपेक्षेप्रमाणे फुलत नाही; ती कडक किंवा सपाट राहते. अशा वेळी एका सोप्या युक्तीने घरच्या घरी एक किलो मैद्याची बाजारासारखी खुसखुशीत आणि थर सुटलेली शंकरपाळी तयार करता येते. त्यासाठी लागणारे साहित्यही अगदी मोजके आहे आणि कृतीही फार अवघड नाही.
लागणारे साहित्य
एक किलो मैदा, एक वाटी साखर, एक वाटी पाणी, एक वाटी तूप, पाव चमचा मीठ आणि तळण्यासाठी तेल एवढेच साहित्य या रेसिपीसाठी पुरेसे आहे. मैदा मोजताना तो वाटीत घट्ट दाबून भरू नये; सैलसर पद्धतीने मोजलेल्या साधारण सहा वाट्या म्हणजे एक किलो मैदा होतो. तुपाऐवजी डालडा वापरायचा असल्यास तोही चालतो.
खुसखुशीत शंकरपाळीची खास ट्रिक
सगळ्यात आधी मोठ्या परातीत मैदा घेऊन त्यात पाव चमचा मीठ नीट मिसळून घ्यावे. दुसरीकडे खोलगट पॅनमध्ये मैदा मोजण्यासाठी वापरलेली तीच वाटी भरून पाणी घालावे आणि त्यात एक वाटी साखर टाकून एक ते दोन मिनिटांत ती पूर्णपणे विरघळवून घ्यावी. साखरेचा पाक करायचा नाही, फक्त ती पाण्यात विरघळली पाहिजे. साखर विरघळल्यावर त्यात एक वाटी तूप घालावे; पाणी गरम असल्याने तूप सहज विरघळते. साखर आणि तूप एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा.
या रेसिपीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण गॅसवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्यावे. गरम मिश्रण थेट मैद्यात घालू नये. मिश्रण थंड झाल्यावरच ते मैद्यात ओतून हलक्या हाताने एकत्र करावे. सुरुवातीला पीठ थोडे पातळ वाटले तरी काळजी करू नये; तुपामुळे ते हळूहळू घट्ट होऊ लागते. चपातीसाठी मळतो तसे हे पीठ अजिबात मळायचे नाही, फक्त हलक्या हाताने एकत्र करून त्याचा गोळा तयार करावा. त्यानंतर गोळा झाकून साधारण पंधरा मिनिटे बाजूला ठेवावा; या वेळेत तुपामुळे पीठ सेट होऊन घट्ट होते. मग थोडे पीठ हाताने हलकेच दाबून मऊ करून घ्यावे.
शंकरपाळी तळताना लक्षात ठेवा
पिठाचा एक भाग घेऊन तो फार जाड किंवा फार पातळ न लाटता मध्यम जाडीचा लाटावा. लाटताना पिठाला काही ठिकाणी हलक्या भेगा पडल्या तरी हरकत नाही. लाटलेल्या पिठाच्या कडा कापून चौकोनी आकार द्यावा आणि सुरी किंवा कटरने आवडीच्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करताना ते खूप कडकडीत करू नये. तेल योग्य तापमानाला आले की सुरुवातीला थोड्याच शंकरपाळ्या तेलात सोडाव्यात, कारण तळताना त्या फुलून आकाराने मोठ्या होतात. तेलात टाकल्यावर लगेच चमच्याने हलक्या हाताने हलवावे आणि शंकरपाळ्या वर तरंगू लागल्यावर त्या उलटून-पलटून मध्यम आचेवर तळाव्यात. अशा रीतीने तयार झालेली शंकरपाळी खारीसारखी थर सुटलेली आणि खुसखुशीत होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply