भारतात षड्यंत्रांबाबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही. अशी षड्यंत्रे मुघल काळापासून नव्हे, तर अनादी काळापासून होत आली आहेत आणि ती आजही सुरू आहेत. त्यामुळे या षड्यंत्रांचा वारंवार उल्लेख करून काहीही फायदा नसल्याचे मत पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
व्याख्यानमालेत मार्गदर्शन
मराठवाडा युवक विकास मंडळ तसेच देवगिरी बँकेच्या सहकार्याने आयोजित स्व. प्रल्हाद अभ्यंकर व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफताना त्रिपाठी यांनी ‘नवीन भारत आणि षड्यंत्रांचे चक्रव्यूह’ या विषयावर बुधवारी (ता. ३) मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बबनराव जगाडे, तसेच व्याख्यानमाला प्रमुख प्रा. नामदेव कराड उपस्थित होते.
नव्या भारताचा उदय आणि राम मंदिर
पुढे बोलताना त्रिपाठी म्हणाले की, भारत काय चांगले करत आहे आणि नव्या भारताच्या उदयासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, हे सांगितले पाहिजे. भारताचे वैभव प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराची ज्या दिवशी स्थापना झाली, त्याच दिवसापासून नव्या भारताचा उदय झाला, असे ते म्हणाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बबनराव जगाडे आणि व्याख्यानमाला प्रमुख प्रा. नामदेव कराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात जगाडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. किशोर शितोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. नामदेव कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. योगिता तौर-होके यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष व्यंकटेश कमळू यांनी आभार मानले. पद्म राजेश लेहेकर आणि तृप्ती पालोदकर यांनी वंदे मातरम् गीत सादर केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply