यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर धाराशिव शहरात घरखरेदीचा उत्साह दिसून आला. सणाच्या काळात अनेकांनी नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला. शहरात २५ अपार्टमेंट आणि पाच रो हाऊसचे बुकिंग झाले असून, यातून सुमारे १७ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे क्रेडाईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरूडा रोड, छायादीप लॉन परिसर, रेल्वे स्टेशन परिसर आणि सांजा रोड या भागांत नवीन घर घेण्याकडे लोकांचा कल अधिक दिसत आहे. शहरात सध्या १५ हून अधिक नामांकित गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यात एकूण ४५० फ्लॅट आणि ५० रो हाऊस खरेदीसाठी उपलब्ध असल्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसमोर अनेक पर्याय खुले आहेत.
एक चतुर्थांश घरे विकली गेली
क्रेडाईचे अधिकारी प्रदीप मुंडे यांच्या माहितीनुसार, शहरातील नवीन प्रकल्पांमधील एकूण घरांपैकी २५ टक्के घरे आधीच विकली गेली आहेत. सध्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटची किंमत साधारण ४० ते ६० लाख रुपयांच्या दरम्यान आहे, तर स्वतंत्र आणि विलासी रो हाऊस ७० ते ७५ लाख रुपयांना मिळत आहे.
फ्लॅट संस्कृती वेगाने रुजते आहे
विकसक सचिन पाटील यांनी सांगितले की, साईरामनगर आणि वरूडा रोड परिसरात नवीन घरे तसेच प्लॉट उपलब्ध आहेत. शहरात प्लॉटचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शिवाय महसूल विभागाशी संबंधित वर्ग-२ चे अनेक विषय प्रलंबित असल्याने, ज्या जागांचे टायटल आणि मालकी हक्क कागदोपत्री पूर्णपणे स्पष्ट आहेत, त्या जागांच्या आणि घरांच्या किमती आपोआप वाढल्या आहेत. मात्र प्लॉट एवढ्याच किमतीत सोयी-सुविधांनी युक्त तयार फ्लॅट मिळत असल्याने लोक फ्लॅट खरेदीकडे वळत आहेत. स्वतंत्र प्लॉट घेऊन त्यावर बांधकाम करणे आज सर्वसामान्यांना परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे शहरात फ्लॅट संस्कृती वेगाने रुजत असून, दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या या उलाढालीमुळे येत्या काळात धाराशिवचे बांधकाम क्षेत्र आणखी विस्तारेल, अशी चिन्हे आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply