भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयोजित रणजी चषक स्पर्धेत नाशिकच्या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. तनय संघवीने महाराष्ट्र संघासाठी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले, तर सत्यजित बच्छावने सिक्कीमकडून खेळताना मणिपूरविरुद्ध तब्बल १३ बळी घेतले. दोघांनी आपापल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
तनयची अष्टपैलू कामगिरी
कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात तनय संघवीने आपल्या तिसऱ्याच रणजी सामन्यात नाबाद ६० धावा केल्या आणि सामन्यात एकूण ५ बळी घेतले. महाराष्ट्राच्या बंगालवरील निर्णायक विजयात त्याचा मोठा वाटा राहिला. पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने केलेल्या नाबाद ६० धावांच्या जोरावर महाराष्ट्राने बंगालवर ७५ धावांची आघाडी घेतली. शेवटच्या गड्यासाठी प्रदीप दाढेसोबत त्याने ६० धावांची भागीदारी केली, त्यामुळे महाराष्ट्राला २१८ धावांपर्यंत मजल मारता आली.
गोलंदाजीतही तनयने जलदगती गोलंदाजीने बंगालला पहिल्या डावात १४३ धावांत रोखण्यात वाटा उचलला. ९ षटकांत ३० धावा देत त्याने ३ गडी बाद केले. बंगालच्या दुसऱ्या डावात त्याने वरच्या फळीतील दोन फलंदाज बाद केले आणि बंगालला १८६ धावांवरच थांबावे लागले. विजयासाठी आवश्यक असलेल्या ११२ धावा महाराष्ट्राचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सचिन धस यांनी नाबाद अर्धशतके झळकावून सहज पूर्ण केल्या आणि महाराष्ट्राने १० गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीमुळे तनय संघवी सामनावीर ठरला.
सत्यजितचे १३ बळी
अहमदाबाद येथे सिक्कीमकडून खेळताना सत्यजित बच्छावने मणिपूरविरुद्ध अफलातून कामगिरी केली. त्याने आपल्या भेदक डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने पहिल्या डावात मणिपूरचे ६, तर दुसऱ्या डावात ७ फलंदाज बाद केले. या १३ बळींच्या जोरावर सिक्कीमने मणिपूरवर २०१ धावांनी विजय मिळवला. सत्यजितने पहिल्या डावात फलंदाजीतही ४१ धावांचे योगदान दिले.
या कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा आणि पदाधिकाऱ्यांनी तनय संघवी व सत्यजित बच्छाव यांचे अभिनंदन केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply